प्रत्येक मूल वेगळं आहे
माझा मोठा मुलगा मिहीर. त्याचं वेगळेपण ४-५ वर्षांचा असल्यापासून जाणवत होतं. त्याला ज्ञान प्रबोधिनी प्रशालेत प्रवेश मिळाला होता. काही गोष्टी, जसं की त्याचं अती संवेदनशील असणं, हळवं असणं हे कसं हाताळावं असे काही प्रश्न होते, ज्याची उत्तरं मिळतील का ह्या शोधात मी होते. Gifted म्हणजे काय, gifted मुलांच्या गरजा का आणि कश्या वेगळ्या असतात वगैरे जसं कळायला लागलं तशी माझ्या प्रश्नांची उत्तरं हळूहळू मिळत गेली. मग त्याबद्दल ऐकलेल्या, समजलेल्या गोष्टींवर जसा मिहीरसाठी विचार करू लागले, तसा तो आपोआपच मेधावीसाठीही होऊ लागला. तेंव्हा मिहीर होता सहावीत आणि मेधावी पहिलीत. Gifted मुलांचे गुणधर्म जे सांगितले त्यातले मेधावीमध्ये तर काही मला दिसत नव्हते. पण तिच्यातही काहीतरी वेगळं आहे हे मात्र दिवसेंदिवस जाणवत होतं. तिचं कायम आशावादी असणं, तिची बारीक निरीक्षणं, वगैरे. आपल्याच दोन मुलांचे अगदी भिन्न स्वभाव, आवडीनिवडी हे लक्षात येत होतं आणि त्यांची तुलना करायची नाही असं आम्ही दोघांनीही ठरवलं होतं. मेधावीच्या बाबतीत एक मोठं आव्हान होतं म्हणजे तिला वाचन अगदी अजिबातच आवडत नव्हतं आणि पाठान्तरही ...