प्रत्येक मूल वेगळं आहे
माझा मोठा मुलगा मिहीर. त्याचं वेगळेपण ४-५ वर्षांचा असल्यापासून जाणवत होतं. त्याला ज्ञान प्रबोधिनी प्रशालेत प्रवेश मिळाला होता. काही गोष्टी, जसं की त्याचं अती संवेदनशील असणं, हळवं असणं हे कसं हाताळावं असे काही प्रश्न होते, ज्याची उत्तरं मिळतील का ह्या शोधात मी होते. Gifted म्हणजे काय, gifted मुलांच्या गरजा का आणि कश्या वेगळ्या असतात वगैरे जसं कळायला लागलं तशी माझ्या प्रश्नांची उत्तरं हळूहळू मिळत गेली. मग त्याबद्दल ऐकलेल्या, समजलेल्या गोष्टींवर जसा मिहीरसाठी विचार करू लागले, तसा तो आपोआपच मेधावीसाठीही होऊ लागला. तेंव्हा मिहीर होता सहावीत आणि मेधावी पहिलीत.
Gifted मुलांचे गुणधर्म जे सांगितले त्यातले मेधावीमध्ये तर काही मला दिसत नव्हते. पण तिच्यातही काहीतरी वेगळं आहे हे मात्र दिवसेंदिवस जाणवत होतं. तिचं कायम आशावादी असणं, तिची बारीक निरीक्षणं, वगैरे. आपल्याच दोन मुलांचे अगदी भिन्न स्वभाव, आवडीनिवडी हे लक्षात येत होतं आणि त्यांची तुलना करायची नाही असं आम्ही दोघांनीही ठरवलं होतं.
मेधावीच्या बाबतीत एक मोठं आव्हान होतं म्हणजे तिला वाचन अगदी अजिबातच आवडत नव्हतं आणि पाठान्तरही होत नव्हतं, एकंदरच अभ्यासाबद्दल प्रचंड नावड होती. तिच्या वर्गातल्या मुलांच्या ती खूप मागे आहे असं जाणवत होतं. थोडं मानसशास्त्राबद्दल समजलं तसं कळलं की अभ्यासात ती मागे असली तरी तिचे काही मूलभूत गुण आहेत जे तिला खूप उपयोगी पडणार आहेत.
पहिला म्हणजे तिचा प्रचंड आशावाद - कितीही वेळा स्पर्धेत हरली तरी पुढच्या वेळी भाग घ्यायला ती खूप उत्सुक असायची. मैत्रिणींनी खेळायला घेतलं नाही तरी रोज जाऊन विचारायची, तितक्याच विश्वासानी मला सांगायची की आज मला त्या घेणार आहेत खेळायला. लपंडाव खेळताना ११-१२ वेळा राज्य आलं तरी चालेल, ना कंटाळता घ्यायची.
आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळवण्यासाठी ती झालं गेलं सगळं विसरून जाते, मान-अपमान, रुसवे-फुगवे जास्त वेळ लक्षात ठेवत नाही.
अभ्यासात नसलं तरी नाटकात पाठांतर उत्तम आहे. आपले आणि इतर पात्रांचेही संवाद पाठ होतात. सभाधीटपणा आहे.
खूप वेगळे वेगळे प्रश्न विचारते - बारीक निरीक्षण असतं. घरात कोणाचं काही सापडत नसेल तर ती सांगू शकते कुठे आहे. दाराबाहेरची चाहूल ऐकून ओळखायची कोण आलंय.
Scholar नाही पण street smart नक्की आहे. माणसांशी बोलण्याची, काम करून घेण्याची कला आहे.
हळूहळू मला पटत गेलं की हेही गुण किती महत्वाचे आहेत. मार्कांसाठी सतत तिच्या मागे लागणं बरोबर नाही. तिला तिचा वेळ द्यायला हवा, तिच्या ह्या गुणांना प्रोत्साहन मिळायला हवं.
मेधावीबद्दल Counsellor शी बोलल्यावर त्यांनी एक खूप छान सुचवलं की तिला शाळेचा अभ्यास एक साधन म्हणून वापरायचं आहे हे समजवायला हवं. पुढे तिच्या आवडीचं क्षेत्र असेल तिथे पोचण्यासाठी ह्याचा उपयोग कसा होईल हे समजवायला हवं.
जसं जसं हे माझ्या लक्षात आलं तसं माझं मनही शांत होऊ लागलं. सतत अभ्यासाचा विषय निघणं बंद झालं, तसा माझा आणि मेधावीचा छान संवाद होऊ लागला. आम्ही वेगळ्या-वेगळ्या विषयांवर बोलायला लागलो, तीही माझं म्हणणं ऐकून घ्यायला लागली. जशी मी शांत झाले तसं घरातल्या लोकांनाही मी समजावू शकले.
आपण प्रत्येक वेळी कसलीतरी पट्टी घेऊन मुलांना मोजायला जातो, कधी मार्कांची, कधी स्पर्धेतल्या बक्षिसांची, ते मूल गाणं, चित्रकला, robotics अशा कुठल्या-कुठल्या क्लासला जातंय ह्याची. पण ह्या पट्ट्या सगळ्या मुलांसाठी सारख्या लावणं बरोबर आहे का? ह्या सगळ्यामध्ये काही गोष्टी आपण बघतच नाही का?
घरातल्या लोकांशी, इतर नातेवाईक, मित्रमंडळी, रोजच्या संपर्कात येणारे लोक ह्यांच्याशी त्या मुलाचं नातं काय आहे, आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींबद्दल त्याची काय मतं आहेत, त्याच्या मनात काय प्रश्न आहेत?
प्रत्येक मूल वेगळं आहे. मेधाविला रोज थोडा वेळ तिच्या स्वतःसाठी लागतो ज्यात तिला हवं ते ती करते. ओढण्या घेऊन नाच असो नाहीतर शाळा शाळा खेळणं असो किंवा स्वतःशीच बोलणं असो. तो वेळ तिला नाही मिळाला तर तिची खूप चिडचिड होते, मग ना अभ्यासात लक्ष लागत ना इतर कुठल्या गोष्टीत. हा वेळ तिच्यासाठी किती महत्वाचा आहे हे मला जाणवलं. अशीच प्रत्येकाची गरज वेगळी असणार. ती आपण ओळखून पूर्ण करायला हवी.
प्रत्येक मुलाचं gifted असणं सतत दिसायलाच हवं असं नाही. पण त्याला खतपाणी घालत राहायला हवं. Nurture करत राहायला हवं, न मोजता, पट्टीशिवाय, ‘performance’ च्या अपेक्षेशिवाय.
Comments
Post a Comment