खाता पिता ढेकर देता हातखंब्याचा ब्रम्हराक्षस
"खाता पिता ढेकर देता हातखंब्याचा ब्रम्हराक्षस" किंवा
"अल्लल्लाङुर्र" अशी आपली ओळख मुलांना करून देणारा हा आमचा 'बालम' काका. पण हा कधीच राक्षस वाटला नाही. सतत झाडाफुलांच्यात, मातीत काम केल्यामुळे रापलेला चेहरा आणि लाल मातीचा रंग चढलेले कपडे, कधी वाढलेली दाढी, असा उंचापुरा हा माणूस एकदम आपल्याला उचलून आपल्या पाप्या घ्यायला लागला की मुलं जरा घाबरायची. पण ओठ काढून रडायला सुरुवात करायच्या आत हा बोलायला लागला की मात्र मुलं रडणं विसरून अचंबित होत असत.
गमती जमती, किस्से, झाडा फुलांची विचित्र शास्त्रीय नावं, विनोद असं काय काय सांगत तो लहान मोठ्या सगळ्यांशीच झटकन दोस्ती करून टाके.
झाडा फुलांची नर्सरी ह्यातला हा तज्ज्ञ, सतत त्याच विचारानी आणि कामानी झपाटलेला, अगदी शेवटपर्यंत.
न शिकता पेटी, बासरी वाजवायचा, गायचा, अनेक भाषांत संभाषण करू शकायचा.
काही शब्द त्याच्याकडून ऐकलेले - टचाटच, डिफडिफ्रंट व्हरव्हरायटी, रत्नागिरीचा नॅशनल ड्रेस - आता आम्हीच इतके वापरतो आणि प्रत्येक वेळी त्याची आठवण काढतो.
त्याच्याबद्दलच्या प्रत्येकाच्या आठवणी अनेक आहेत, त्याचे आम्ही आई बाबांकडून ऐकलेले किस्से अनेक आहेत.
जीव तोडून, झोकून देऊन काम करणं आणि मनस्वी जगणं म्हणजे काय ह्याचं तो उदाहरण आहे.
आणि त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग म्हणजे अनुराधा काकू. काका इतके वर्ष इतकं काम करु शकला, कामात स्वतःला झोकून देऊ शकला कारण ती त्याची काळजी घेत होती, त्याचबरोबर बाकी सर्व गोष्टी पण सांभाळत होती.
असा एकमेव अद्वितीय काका आमच्या आठवणीत कायम राहील.
Comments
Post a Comment