आमचेही ZNMD


 (लोकमत ‘ऑक्सिजन’ पुरवणीसाठी लेख)


तीन देशांतल्या चार शहरांतल्या आठ जणींची एक अविस्मरणीय सहल

“म्हणालो होतो की नाही आपण की लेख लिहायला पाहिजे आपल्या ह्या अनुभवाबद्दल? आज संधी आली आहे तो लेख लिहिण्याची”. मला आमच्या स्पेन च्या ट्रिपबद्दल लिहायला सांगितल्यावर मी सगळ्यांना मेसेज केला, सगळ्या परत ३ वर्ष मागे गेल्या….

कल्पना सुचली

आम्ही सगळ्या म्हणजे अनू, शलाका, आरती, अदिती, नंदिता, शिल्पा, हेमा आणि केतकी कॉलेजमधे BCS ला एका वर्गात होतो. कॉलेज संपून २० वर्ष झाली तरी आधी ई-मेल, yahoo group आणि नंतर whatsapp आणि facebook वरून जास्त मैत्रिणी झालो. सगळ्या वेगवेगळ्या देशात विखुरलेल्या पण पुण्यात भेटत राहिलो. आणि अशातच एकदा अदिती कामानिमित्त U.K ला गेली असताना शलाकाकडे गेली होती. त्यांच्या बोलण्यात विषय निघाला की आपण सगळ्यांनी मिळून कुठेतरी जाऊया. हा धागा पकडून ती परत आल्यावर आमच्या गप्पा रंगल्या आणि आम्ही खरंच ह्याचा विचार करू लागलो. दोघी जणी अमेरिकेत, एक U.K मध्ये, बाकी पाच पुण्यात. कोणालाच फार जास्त प्रवास करावा लागू नये म्हणून युरोपला जाण्याचा विचार केला. बाकी काही देश काहीजणींचे बघून झाले होते आणि मजा पण येईल आणि सगळीकडे हिंडता येईल असं ठिकाण हवं होतं. मग ‘स्पेन’वर एकमत झालं. “जिंदगी ना मिलेगी दोबारा” नी सगळ्यांना भुरळ पाडली होतीच. मार्च २०१४ च्या शेवटच्या काही दिवसात स्पेन हे ठिकाण आणि मे २०१५ हे नक्की झालं.

प्लँनिंग सुरु

ई-मेल आणि whatsapp वरून भरपूर चर्चा सुरु झाली. कुठे कुठे जायचं , काय बघायचं वगैरे. आरतीनी Rick Steves चं स्पेनबद्दलचं एक ट्रॅव्हल गाईड घेतलं, कोणी स्पेनला जाऊन आलेल्या मित्र-मैत्रिणींना विचारलं , कोणी इंटरनेटवरून माहिती शोधली, असा सगळ्यांनी आपापला रिसर्च चालू केला. मी तसं काही केलं नाही, जे सगळ्या ठरवतील ते आपण करायचं इतकंच ठरवलं. एक मात्र सगळ्यांचं पक्कं ठरलं होतं की आमचं आम्ही सगळं ठरवायचं आणि आमचं आम्हीच जायचं , कुठल्याही टूर कंपनी बरोबर जायचं नाही. कारण टूर कंपनीनी ठरवलेली ठिकाणं त्यांनी ठरवलेल्या वेळीच बघायची हे कोणालाच मान्य नव्हतं. आणि सगळ्याच जणी भरपूर प्रवास केलेल्या असल्यामुळे तो अनुभव पाठीशी होता.

अधून मधून चर्चा थंडावली की कोणीतरी परत ती ठिणगी पेटवायचो. फेसबुकवर आमचा ZNMD 2015 असा एक ग्रुप बनवला आणि जे जे महत्वाचं वाटेल ते त्यावर टाकू लागलो. सगळ्यांचे वेगळे वेगळे टाइम झोन सांभाळून एक वेळ ठरवली त्यावेळी पहिला एक कॉन्फरन्स कॉल केला जुलै २०१४ मधे. बहुतेक सगळ्याच सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करत असल्यामुळे किंवा आधी केलेलं असल्यामुळे हे मस्त जमतं आम्हाला. तीन देश - भारत, USA आणि UK , चार शहरं आणि आठजणी कॉन्फरेन्स कॉलवर भेटलो आणि तारीख पक्की केली. सगळ्यांची मुलं वेगवेगळ्या वयाची, त्यांच्या शाळांच्या सुट्ट्या, नवऱ्यांच्या सुट्ट्या (कारण आम्ही स्पेनला गेल्यावर तेच सगळं सांभाळणार होते), प्रत्येकीच्या ऑफिसच्या कामाच्या डेडलाईन्स वगैरे सगळं बघून तारीख ठरवणं काही सोप्पं काम नव्हतं पण तो पहिला महत्वाचा निर्णय झाला. घरी काय किंवा ऑफिसमधे काय हेच तर करत असतो!

व्हिसा, हॉटेल आणि फ्लाईट बुकिंग

जानेवारी २०१५ मध्ये पुण्यातल्या सगळ्यांची विमानाची तिकिटं निघाली, आणि आता आमची ट्रिप खरंच होणार हे ठरलं. मग दर काही आठवड्यांनी कॉन्फरन्स कॉल व्हायला लागले आणि पटापट गोष्टी पुढे सरकत गेल्या. त्या कॉल्स मध्ये बाकी सगळ्या एकीकडे हॉटेलच्या किंमती , त्याचे reviews बघायचो आणि एकीचा स्क्रीन आम्ही शेअर करायचो त्यावर , हॉटेलची सगळी बुकिंग करायचो. त्याचबरोबर सर्व बस, ट्रेन ह्यांचीच बुकिंग्स नाही तर काय बघायचं त्या सर्व attractions आणि फ्लॅमेन्को शो ची पण बुकिंग्स केली. Multitasking masters!

गिरिकंद ट्रॅव्हल्स मुळे व्हिसाचं काम सोपं झालं. खर्चाचा हिशोब ठेवायला एक app install केलं आणि अदितीनी ती जबाबदारी शेवटपर्यंत उत्तम पेलली. आम्ही तिची मर्जीही शेवटपर्यंत सांभाळली! कुठेही कोणाचं किती येणं आहे वगैरेबाबत गैरसमज नाही. प्रत्यकीकडे cash किंवा आपापलं Multicurrency card आणि एक सगळ्यांचं मिळून card घेतलं ज्यात सगळ्यांनी पैसे घातले. सगळ्या अपार्टमेंट आणि हॉटेल्समधे शलाकानी फोन करून बुकिंग झाल्याची खात्री केली, अपार्टमेंटच्या किल्ल्या कुठे मिळतील ह्याची माहिती काढली, तिथे नक्की काय काय सोयी आहेत हे विचारून घेतलं.

ट्रिप सुरु ! (Madrid आणि Toledo )

पुण्यातून शिल्पा, नंदिता, हेमा, अदिती आणि मी निघालो, मुंबई-दोहा-माद्रिद असा प्रवास करून ९ मे २०१५ ला माद्रिद एअरपोर्टवर शलाकाला भेटलो ! टॅक्सी बुक केली होती, दोन प्रीपेड सिमकार्ड घेतली आणि अपार्टमेंटवर पोचलो. आम्ही माद्रीदच्या रस्त्यांवरून एक चक्कर मरून येईपर्यंत आरती अपार्टमेंटवर पोचली होती आणि आम्ही आणलेल्या खाकऱ्यांवर तिने ताव मारायला सुरुवात केली होती. सगळ्यांना भूक लागली होती, परत बाहेर पडलो, patatas bravas आणि paella खाऊन परत आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी चहा करण्यासाठी जवळच्या दुकानातून सामान आणलं. सकाळी उठून चहा केला तेंव्हा लक्षात आलं की स्पॅनिशमधे साखरेला काय म्हणतात हे माहिती नसल्यामुळे आपण साखरेच्या ऐवजी मीठ आणलं आहे ! ह्या अनुभवानंतर सगळीकडे काहीही विचारायचं असेल, विकत घ्यायचं असेल की लगेच फोन बाहेर काढून आधी Google translate! Madrid मधल्या दुकानात खरेदीचा श्रीगणेशा झालाच, पहिल्याच दिवशी. स्पेनमध्ये जितकी shoes ची दुकानं आहेत तितकी कुठे असतील असं वाटत नाही.

अपार्टमेंटवरच ब्रेकफास्ट करून प्रसिद्ध Prado museum, Reina Sofia museum, रस्त्याच्या कडेला असलेल्या कॅफे मध्ये वाईन , असा मस्त कार्यक्रम आणि परत अपार्टमेंटवर.

 दुसरा दिवस Toledo मधे घालवला, Madrid वरून ट्रेननी प्रवास करून तिथे पोचलो, बसची टूर घेतली, तिथलं कॅथेड्रल पाहिलं, एका हातात भला मोठा सँडविच घेऊन खात खात तिथल्या अरुंद गल्ल्या पालथ्या घातल्या, अर्थातच खरेदी केली आणि संध्याकाळी परत Madrid ला आलो.

सेव्हिया (Sevilla)

१२ मे ला सकाळी लवकर उठून सामान घेऊन निघालो, ताशी २०० कि.मी. वेगानी जाणाऱ्या ट्रेनमधून सेव्हियाला गेलो. त्या प्रवासात सगळे कामाला निघालेले लोक होते, त्यांचे कपडे, केसाची style, मेकअप, shoes वगैरे सगळंच बघण्यासारखं , एकदम कडक!

 सेव्हियाला पण अपार्टमेंट बुक केलेलं होतं तिथे पोचलो, सामान ठेवलं आणि परत फिरायला निघालो. जेवण असंच एका रस्त्याच्या कडेला टेबलं लावलेल्या कॅफे मध्ये, त्याबरोबर थंडगार Sangria, आssहा . त्यानंतर काहीजणींनी घोडागाडीमधून एक चक्कर मारली आणि परत अपार्टमेंटवर आलो तोपर्यंत अनू येऊन पोचली होती. तिची Madrid-Sevilla फ्लाईट रद्द झाली तर पठ्ठीनं आयत्यावेळी धडपड करून शोधून काढून एअरपोर्टवरून ट्रेन स्टेशनची बस पकडली, तिथून ट्रेननी Sevilla ला आली, फ्लाईट पोचण्याच्याच वेळी पोचली! आहे की नाही भारी! मग प्रचंड उन्हात आम्ही Bullfights होतात ती bull ring बघून आलो. मग संध्याकाळी Tapas आणि drinks आणि रात्री १२ वाजता हेमाचा वाढदिवस साजरा केला आमच्या अपार्टमेंटच्या खालच्या कॅफे मधे! रात्री १२ वाजता तिथे हिंडताना अजिबात असुरक्षित वाटलं नाही. अर्थात, आमचं इतकं जोरजोरात बोलणं आणि हसणं चालू होतं की आमच्यापासून सगळे बहुतेक चार हात लांबच थांबले असावेत.

१३ मे ला सकाळी बाहेर पडलो, Plaza de Espana, Army museum बघून जेवायला गेलो. शिल्पाला कॅथेड्रल बघायचं होतं , ती टॅक्सी करून गेली, आम्ही एका पार्कमधे गेलो तिथे ६ लोकांनी पायानी सायकलसारखी चालवण्याची एक गाडी होती, त्यात सातजणींनी पार्कला फेऱ्या मारल्या आणि आजूबाजूच्या लोकांची भरपूर करमणूक केली! ७-८ वर्षांच्या मुलींसारख्या हसत खिदळत होतो आम्ही, इतकी धम्माल आली.

संध्याकाळी स्पेनचा प्रसिद्ध फ्लॅमेन्को डान्स चा एक तासाचा क्लास केला आणि नंतर शो बघितला. फक्त हेमाला जमला फ्लॅमेन्को बाकी आम्ही काहीही करत होतो! बॉलीवूड सिनेमात दाखवतात तसा नव्हता हा शो, खराखुरा फ्लॅमेन्को होता, थोडेच लोक एकावेळी बसू शकत होते बघायला, पण मजा आली, शिकायला आणि बघायला पण. जेवण करून परत आलो, आणि दुसऱ्या दिवशीचं प्लँनिंग केलं कारण दुसऱ्या दिवशी सकाळी निघून कार चालवत Granada ला जायचं होतं. जायचा रस्ता एकदा नकाशा पसरून सगळ्यांनी समजून घेतला, दोन गाड्या होत्या त्यामुळे प्रत्येक गाडीत ड्राइव्हर कोण , रस्ता सांगायला कोण ह्याची विभागणी झाली. माझ्यासारख्या ज्यांना ह्या दोन्हीतलं काहीच जमण्यासारखं नव्हतं त्यांनी मागे बसून फक्त moral support देण्याचं महत्वाचं काम केलं.

Sevilla ते Granada

दोन गाड्या ताब्यात तर घेतल्या पण दोन्हीच्या GPS मध्ये रस्ते वेगवेगळे दिसत होते! बराच वेळ त्याच्याशी झगडा केल्यावर लक्षात आलं की एकावर पोर्तुगल मधलं Granada दाखवत होतं! ते बरोबर केलं आणि निघालो, एक गाडी आरती चालवत होती, एक गाडी अनू. दोघी अमेरिकेत राहात असल्यामुळे उजव्या-डाव्या बाजूचा गोंधळ होणार नव्हता कारण स्पेनमधेही रस्त्याच्या उजवीकडूनच गाड्या जातात. पण दोघींची शाबास, न कंटाळता दिवसभर दोघींनी गाडी चालवली!

व्हाईट हिल टाऊन्स बघत बघत जायचं होतं Granada ला. इतकी गोड छोटी छोटी गावं आहेत ही सगळी, चित्रातल्यासारखी, सगळी घरं स्वच्छ पांढरी रंगवलेली, प्रत्येक घरात कुंड्यातून फुलांचे घोसच्या घोस ओसंडत होते, शांत रस्ते, छोटी दुकानं, सगळंच सुंदर! Bornos ला एका दुकानातून फळं घेतली, ती खात खात रस्त्यावरून फेरफटका मारला आणि निघालो. Grazalema national park मधून जाणारा रस्ता, दोन्ही बाजूंनी अप्रतिम निसर्गसौंदर्य , ते बघत Grazalema ला पोचलो. सगळं गाव दुपारची झोप काढत होतं, उगीच पुण्याला नावं ठेवतात सगळे. पण एके ठिकाणी आम्हाला जेवण मिळालं, जेवून थोडा वेळ हिंडून परत निघालो, Ronda ला थांबलो. खूप चाललो Ronda मध्ये, जुना १८व्या शतकात बांधलेला पूल बघितला, खरेदी केली, एका ठिकाणी ताजा संत्र्याचा रस प्यायलो ज्याच्यात आळी सापडली, पण दुकानदार मान्य करेना. त्याला खूप बोललो - मराठीतून! तो एक वाईट अनुभव सोडल्यास परत कुठेही असं घडलं नाही, सगळीकडे खूप हसतमुख, मदत करणारी लोकं भेटली.

तिथून सरळ Granada गाठलं पण तिथे अजूनच एक मजेशीर किस्सा घडला. पेट्रोल भरायला थांबलो तर पेट्रोल जिथून भरायचं ते झाकण उघडायचं कसं हे कोणालाच सापडेना. येणारे जाणारे पण प्रयत्न करून गेले, शेवटी एक भला माणूस भेटला ज्याला ते माहिती होतं ! मग रात्री ११ वाजता गाडी ट्रेन स्टेशनच्या मागे परत करायला गेलो. तिथून टॅक्सी मिळाली, सामानासकट हॉटेलमधे दाखल झालो, ज्यांना भूक होती त्यांनी समोरच्या एका इंडियन रेस्टॉरंटवाल्याला (म्हणजे बहुतेक बांगलादेशी असावा ) तो बंद करत असलेलं रेस्टॉरंट उघडायला लावलं आणि जे त्याच्याकडे होतं ते खाऊन झोपलो. सकाळी लवकर उठण्याचा प्रश्नच नव्हता!

१५ मे ला सकाळी आरामात उठलो, जवळच्या एका कॅफेमधे खाल्लं आणि थोडा वेळ शहरात हिंडून अल्हम्ब्रा नावाच्या ठिकाणी गेलो. तिथले जुने राजवाडे आणि त्यांच्या बाजूच्या बागा पूर्वी होत्या तश्याच परत केल्या आहेत. तिथे ८०० ते १३०० सालापर्यंत मुसलमान आणि ख्रिश्चन राजांचे राज्य असल्यामुळे दोन्ही प्रकारचे वास्तुशास्त्राचे नमुने पाहायला मिळतात. हे युनेस्को जागतिक वारसा स्थान (World heritage site) आहे. रोज फिरून आल्यावर रात्री उशिरापर्यंत गप्पा चालायच्या त्या आपोआप डोळे मिटायला लागल्यावर संपायच्या.

 शेवटचा दिवस

१६ मे शेवटचा दिवस, सकाळी लवकर उठून बस पकडून परत माद्रीदला गेलो. बसमधे फक्त आमचाच बोलण्याचा आवाज येत होता. माद्रिदला पोचल्यावर टॅक्सिनी ट्रेन स्टेशनवर गेलो, आता तिसऱ्यांदा त्याच स्टेशनवर आल्यावर ते एकदम ओळखीचं वाटायला लागलं होतं - अगदी आपल्याच गावात परत आल्यासारखं! तिथे लॉकर्स होते ज्यात आम्ही आमचं सामान ठेवलं कारण परत माद्रिदमध्ये फिरायचं होतं. हे असे लॉकर्स मिळतात हे आधीच शोधून ठेवलेलं असल्यामुळे सोपं झालं. तिथे आपण आपलं सामान स्कॅन करायचं, किती मोठा लॉकर पाहिजे त्याप्रमाणे पैसे भरायचे, लॉकरमधे सामान ठेवायचं, इलेक्ट्रॉनिक लॉक लावायचं, हे सगळं सेल्फ सर्विस! मग माद्रिदचा राजवाडा पाहायला गेलो. भव्य दिव्य असा राजवाडा, त्यातल्या अनेक अनेक खोल्या, प्रत्येक खोलीला वेगळ्या रंगाची सजावट, छतावर अप्रतीम चित्र, सगळं इतक्या काळजीपूर्वक सांभाळून ठेवलं आहे, इतकी हजारो लोकं रोज बघायला येतात तरीही. सगळीकडे माहिती स्पॅनिशबरोबर इंग्लिशमधेही लिहिलेली आहे.

तिथून mercado de san miguel नावाच्या एका प्रकारच्या मंडईमध्ये गेलो जिथे शेकडो प्रकारचे खाद्यपदार्थ, मासे, मांस, चीज, वाईन असे स्टॉल्स होते. चीज, वाईनची चव घेतली, काही ओळखूही न येणाऱ्या प्राण्यांची डोकी आणि काही अवयव वगैरे ठेवलेले बघितले! पहिल्या दिवशी ज्या अपार्टमेन्टमधे उतरलो होतो तिथे जाऊन आलो कारण ते अनूने बघितलं नव्हतं. एअरपोर्टजवळच्या हॉटेलमधे बुकिंग केलं होतं. टॅक्सिवाल्यानी चुकून लांबून नेलं म्हणून स्वतःहून पैसे कमी केले. तो पूर्वी फॉर्म्युला वन चा ड्रायव्हर असावा - इतकी जोरात गाडी चालवत होता.

रूमवर जाऊन पॅकिंग केलं, जेवण केलं आणि कोणाची येणी देणी होती ती संपवली. अदितीने इतका चोख हिशोब ठेवला होता की हे काम अगदी पट्कन झालं. मग परत भरपूर गप्पा. इतक्या वर्षांनी पुन्हा भेटल्यामुळे आमची परत नव्याने मैत्री झाली असं म्हणायला हरकत नाही. दुसऱ्या दिवशी पहाटेपासूनच एकेकीची आवराआवरी करून आपापल्या फ्लाईट पकडल्या.

अशी आमची एक आगळीवेगळी ट्रिप संपली आणि ही तर सुरुवात आहे, अजून अश्या अनेक ट्रिप्स करायच्या असं ठरवूनच निरोप घेतला एकमेकींचा.

अविस्मरणीय

सगळ्यांचं सगळं वेळापत्रक जमवून ८ जणी इतकं उत्तम प्लँनिंग करून आम्ही खरंच स्पेनला जाऊन आलो हे आमच्यासाठी खूपच काहीतरी मिळवल्यासारखं होतं. तीन वर्षांनंतरही नुसत्या त्याच्या आठवणींनी सुद्धा इतकं मस्त वाटतं, सगळा मूड बदलतो. ही खूप पैसे खर्च करून पण थोड्या दिवसात अनेक ठिकाणं दाखवणारी रेडिमेड टूर नव्हती, पण आम्ही खूप जास्त मजा केली. हॉटेलच्या ऐवजी अपार्टमेंटमधे राहिलो , ट्रेन, बस सगळ्याची खूप आधी तिकिटं काढलेली, त्यामुळे आमचे पैसेही खूप वाचले. आम्हाला ठिकाणं निवडण्याचं स्वातंत्र्य होतं, कुठे किती वेळ घालवायचा, काय खायचं, museum ला न जाता दुसरंच काहीतरी बघायचं असं सगळं आमच्या मनाप्रमाणे करता आलं. दोन जणींनी सायकलवरून शहर बघितलं, बाकी जरा दुपारी विश्रांतीसाठी गेल्या, रस्त्यावर हिंडताना चार जणी एका दुकानात तर बाकीच्या सावलीला बसलेल्या, असं पण केलं.

पूर्वतयारीही खूप केली होती. त्यामुळे काही गडबड गोंधळ नाही, ठरवलेलं सगळं केलं, आमच्या मर्जीनुसार, कधी आरामात तर कधी धावतपळत, जे नव्हतं बघायचं ते बघायचं बंधन नाही. खर्च सगळ्यांच्या बजेटमधे बसणारा, फक्त टुरिस्ट जातात त्याच ठिकाणी न जाता, तिथलं रोजचं जीवन, माणसं, त्यांचं खाणं-पिणं हे सगळं बघता आलं. Tapas, Sangria, Paella, sherry, Flamenco ह्या सगळ्याची मजा घेतली. ट्रेन, बस, सेल्फ-ड्राईव्ह कार, टॅक्सी, सर्व प्रकारचा प्रवास झाला, फक्त बोटीचा प्रवास राहिला!

 हे अगदी typical वाटलं तरी सांगितलंच पाहिजे की आमच्या नवऱ्यांनी आणि मुलांनी आम्हाला “बिंधास जा, आम्ही इथे सगळं सांभाळतो” असं सांगून प्रोत्साहन दिलं आणि खरंच सगळं सांभाळलं, म्हणून आम्ही इतकी मजा करू शकलो, ८ दिवस स्वतःसाठी देऊ शकलो, घरची काहीही चिंता न करता.

ह्या ट्रिपनी दिलेला ऑक्सिजन आम्हाला अजूनही पुरतो आहे, आणि आम्ही पुढच्या ट्रिपचा विचार चालू केलेलाच आहे!

- केतकी करंदीकर, आरती नेने, शिल्पा गोखले, अदिती दीक्षित

Comments

Popular posts from this blog

Alter-tailor

खाता पिता ढेकर देता हातखंब्याचा ब्रम्हराक्षस

Innocence